सोलापूर : सोलापूर शहरातील महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सत्ताधारी भाजपने मराठा समाजातील नगरसेवक मोठ्या संख्येने असतानाही महापौर पदासाठी ओबीसी समाजातील उमेदवाराची निवड केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले आहे.
गुरुवार, दि. 5 मार्च रोजी शहरातील चार पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राम जाधव यांनी अर्धनग्न आंदोलन करून या निर्णयाचा निषेध नोंदवला. महापौर निवडीत मराठा समाजाला डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील सत्ताधारी भाजपचे नेते, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. देवेंद्र कोठे यांच्यावरही या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.
राम जाधव म्हणाले की, महापालिकेत मराठा समाजाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात असतानाही त्यांना संधी न देता ओबीसी समाजातील उमेदवाराला महापौरपद देण्यात आले. त्यामुळे लाखो मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा निर्णय अन्यायकारक असून तो तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सुरू केलेले आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राम जाधव यांनी दिला आहे. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.