Solapur Municipal Corporation Election  Pudhari Photo
सोलापूर

Solapur News : महापौरपदासाठी दीड तासाचा थरार; उमेदवार कोण?

आज उमेदवारी अर्ज दाखल होणार; सकाळी दहा ते साडेअकरापर्यंतची वेळ, सहा फेब्रुवारीला निवड

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून, या निवडणुकीसाठी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महापौरपदासाठी सोमवार, 2 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दीड तासाचा अवधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या अल्प वेळेत भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते, याकडे अवघे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

यंदा महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले असून भाजपमध्ये या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून अनंत जाधव हे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल हेदेखील महापौर पदाच्या शर्यतीत अग्रेसर आहेत. याशिवाय आमदार सुपुत्र डॉ. किरण देशमुख यांचे नावही रेसमध्ये आघाडीवर असल्याचेही राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

भाजपने नुकतीच गटनेतेपदाची निवड करताना ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. त्यामुळे आता सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर पदासाठी मराठा समाजाला संधी दिली जाते की अन्य समाजाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होते, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी अंतर्गत गटबाजी, आमदारांचे प्रभावी लॉबिंग आणि समाजीय समीकरणे यामुळे महापौर पदाची निवडणूक अधिकच रंजक ठरणार आहे. दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापौरपदाच्या निवडीकडे संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT