Solapur Municipal Elections Pudhari Photo
सोलापूर

Solapur Politics : व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य

तुम्ही कोणाचे समर्थक यापेक्षा पक्षाशी किती प्रामाणिक हाच निकष

पुढारी वृत्तसेवा

दीपक शेळके

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील महापौर निवडीने यंदा केवळ सत्ताबदल नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणातील मोठा प्रयोग उघड केला आहे. भाजपाने प्रथमच स्पष्टपणे व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य दिल्याचे या निवडीतून समोर आले आहे. जो पक्षासाठी जगतो, पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहतो, त्यालाच संधी आणि जो व्यक्ती किंवा गटाशी भावनिक नाते जपतो, त्याला पक्षात स्थान नाही, अशी ठाम भूमिका भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून घेतली गेल्याचे संकेत या घडामोडीतून मिळाले.

महापौर निवडीपूर्वी भाजपामध्ये अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. परंतु भावनिक, गटबाजीवर आधारित आणि व्यक्तीभोवती फिरणाऱ्या राजकारणाला पूर्णविराम देत पक्षाने अनेक अनुभवी आणि प्रभावी नेत्यांचा यंदा पत्ता कट केला. तुम्ही कोणाचे समर्थक आहात यापेक्षा तुम्ही पक्षाशी किती प्रामाणिक आहात हेच निकष ठरल्याने अनेक राजकीय समीकरणे एका झटक्यात बदलली.

या नव्या धोरणाचा सर्वात मोठा फायदा झाला तो विनायक कोंड्याल यांना. अपक्ष, काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करून पुन्हा भाजपात प्रवेश केलेले विनायक कोंड्याल हे नगरसेवक असले तरी त्यांची खरी ओळख म्हणजे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी. मात्र यावेळी नातेसंबंधांपेक्षा पक्षनिष्ठेची छाप अधिक ठळक राहिली. भाजपाने कोंडयाल यांच्यावर विश्वास टाकत महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. या निर्णयामुळे भाजपातील अंतर्गत संघर्षात आ. देवेंद्र कोठे यांनी मोठा डाव साधल्याचे स्पष्ट झाले आहे. दीर्घकाळ सोलापूरच्या राजकारणात प्रभाव राखणाऱ्या आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख दोन्ही गटांवर मात करत कोठे यांनी महापौरपद आपल्या गटाकडे खेचून आणले. विशेष म्हणजे अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत आमदार झाल्यानंतर आ. कोठे यांनी महापौरपद पूर्णतः आपल्या ताब्यात घेत भाजप पक्षावर पकड मजबुत करत महापालिका ताब्यात घेतली.

महापौर निवड ही केवळ पदाची लढाई न राहता भाजपाच्या नव्या राजकीय प्रयोगाचे प्रतीक ठरली आहे. सोलापूरमधील ही घडामोड राज्यभरातील भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरणारी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT