सोलापूर : दिवाळीतील लक्ष्मीपूजन रविवारी तर पाडवा मंगळवारी आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये शनिवारी (दि. ७) खरेदीसाठी मोठी गर्दी होती. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला लागणारे साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये लगबग सुरू होती. वही व गादी पूजनासाठी मुहूर्त पाहून खतावणी, लेखणी, गादी यांची खरेदी केली जात होती.
झेंडूची फुले, फुलांचे हार, नारळ, फळे, ओटीचे साहित्य, केरसुणी तसेच पूजेच्या अन्य साहित्याच्या खरेदीला वेग आला होता. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत होता. घरोघरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केले जाते. त्यामुळे बाजारात दिवसभर खरेदीसाठी मोठी गर्दी होती.
पूजेच्या साहित्य खरेदीला वेग
पूजेच्या साहित्यामध्ये बताशे, लाह्या, सुपारी, विड्याचे पान, धणे आणि खडीसाखर, मुरूडशेंग, कमळाचे बी, केरसुणी यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होती. ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची तयार पाकिटेही बाजारात उपलब्ध आहेत. एका पाकिटाची किंमत ४० रुपये असून, त्यामध्ये खारीक, बदाम, खोबरे, हळकुंड आणि सुपारीचा समावेश आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे साहित्य खरेदी करण्याऐवजी तयार पाकिटांना काही ग्राहक पसंती देत आहेत.
कोहळा, भोपळा महाग
अमावस्ये दिवशी पूजेसाठी लागणारा कोहळा आणि भोपळाही बाजारात आहे. कोहळ्याचे दर १२० ते १५० रुपये, तर भोपळ्याचे दर ८० ते १०० रुपये आहेत. याशिवाय पूजेसाठी लागणाऱ्या पाटांचीही विक्री सुरू असून, आकारानुसार पाट ८० ते २५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
आकर्षक हार खरेदीकडे कल
बाजारात झेंडूची फुले ६० ते ८० रुपये दराने विकली जात होती. तर फुलांच्या हारांची किंमत ५० रुपयांपासून थेट १ हजार ५०० रुपयांपर्यंत होती. पूजेसाठी आकर्षक हार खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. तसेच पूजेसाठी लागणारी पाच फळे ५० रुपयांना दिली जात होती. केळीच्या पानांची जोडी ५० ते ७० रुपयांना विकली जात होती.
नारळाला ग्रामीणमध्ये प्रतिसाद कमी
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या नारळांचीही बाजारात विक्री होत आहे. नारळाचे दर ३० ते ४० रुपये आहेत. दररोज दोन गाड्यांमधून नारळांची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, यंदा दिवाळीत ग्रामीण भागात नारळाला अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दरवर्षी नारळाची मागणी वाढलेली असते. पण, यंदा दुष्काळाचे सावट असल्याने ग्रामीण भागात नारळाची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. पण, शहरात मात्र नारळ खरेदीला चांगला प्रतिसाद आहे.- संजय बिराजदार, नारळ विक्रेता