सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आ. सचिन कल्याणशेट्टी व काँग्रेसचे माजी आ. दिलीप माने हे किंगमेकर ठरले. तसेच त्यांना भक्कम हातभार दिला तो दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापूरे यांनी. या त्रिमूर्तीमुळेच बाजार समितीवर श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला. या निवडणुकीत भाजप आ. सुभाष देशमुख यांनी पुत्र मनीष यांच्यासाठी पुरेशी ताकद लावली व त्यात ते यशस्वीही झाले. मात्र अन्य सदस्यांबाबत त्यांचा करीश्मा चालला नाही. आ. विजयकुमार देशमुख यांचा या निवडणुकीत काहीच लाभ झाला नाही, ही सर्व या निवडणुकीची वैशिष्टे ठरली.
राज्यातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक उलाढाल असणार्या या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. भाजपचे आ. कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्या बाजूने काँग्रेसचे माजी आ. दिलीप माने व सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापूरे, श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे हे खंबीरपणे उभे राहिले.यांच्या विरोधात आ, सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख या भाजप आमदारांच्या साथीला काँग्रेसचे माजी आ. सिध्दाराम म्हेत्रे व माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी ताकद पणाला लावली. चार विद्यमान व दोन माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीत आ. कल्याणशेट्टींनी आ. कोठे, माजी आ. माने, हसापूरे व शिवदारे या नेत्यांना सोबत घेत सर्वपक्षीय मोट बांंधण्यात यश मिळवले.
आ. कल्याणशेट्टी यांचे नेतृत्व मान्य करून सर्वच स्थानिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून माघार घेण्यापर्यंत सर्वाधिकार आ. कल्याणशेट्टींना बहाल केले. विशेष म्हणजे त्यांनी देखील अन्य नेत्यांना प्रत्येक निर्णयात विश्वासात घेत पावले उचलली. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यापासून प्रचार यंत्रणा हाताळणी ते मतदानांपर्यंत आ. कल्याणशेट्टी, हसापुरे यांनी जुन्यांसह नवख्या उमेदवारांनाही पुरेशी ताकद पुरवली. उत्तरमधील संपूर्ण जबाबदारी माजी आ. माने यांनी आपल्या खांद्यावर घेतली. तर हसापूरे यांनी दक्षिण सोलापूरची सुभेदारी यशस्वीपणे हाताळली.
विरुद्ध बाजूला आ. सुभाष देशमुख यांनी चिरंजीव मनिष यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्यासाठी ग्रामपंचायत मतदार संघात त्यांना उतरवले. मनीष यांच्या विजयासाठी त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले. मात्र अन्य उमेदवारांना निवडणूक आणण्यात त्यांना यश मिळाले नाही. माजी संचालक रामप्पा चिवडशेट्टी स्वतःच्या हिंमत्तीवर निवडून आले. शिवाय अतुल गायकवाड यांच्या विजयासाठीही चिवडशेट्टी झगडल्याने त्यांचाही विजय सुकर झाला. खंदेे समर्थक यतीन शहा यांचा मात्र पराभव मात्र आ. सुभाष देशमुख यांना टाळता आला नाही. तर आ. विजयकुमार देशमुख यांच्या ताकतीचा फायदा उमेदवारांच्या विजयासाठी झालेला नाही, हे ही या निकालातून स्पष्ट झाले. तसेच काँग्रेसचे माजी आ. म्हेत्रे व माजी जिल्हाध्यक्ष शेळके यांच्याही ताकतीचा व राजनीतीचा उपयोग झाल्याचे या निकालात कुठेही दिसले नाही.
अटीतटीच्या झालेल्या या लढतीत आ. कल्याणशेट्टी व माजी आ. माने हेच खरे हिरो ठरले. तसेच सर्व नेत्यांना एकत्रित आणण्यात सुरेश हसापुरेंनी मुख्य भूमिका बजावली. यामुळेच हा दणदणीत विजय श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला मिळाला हे वास्तव आहे.