Maratha Reservation Protest 
सोलापूर

Maratha Reservation Protest: आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर

सोलापूर-पुणे महामार्ग रोखला; आंदोलनामुळे वाहतूक ठप्प

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे पुलाजवळ रास्ता रोको करण्यात आला. सुमारे अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहनचालक, प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली.

सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित न ठेवता आंदोलकांशी चर्चा करून तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी होते.

पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, सोमनाथ राऊत, राजन जाधव, सुभाष पवार, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

मनोज जरांगे हेे ११ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. त्याचा निषेध आणि जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. समाज एकवटला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मराठा समाज माघार घेणार नाही.
- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT