माढा : भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केलेल्या मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामाला शनिवारी माढा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मनोहर भोसले याच्यावर यापूर्वीच चार गुन्हे दाखल आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे होते. भोंदुगिरी आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात बारामती व दौंड पोलिस ठाण्यांतही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. आता कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरी केल्याप्रकरणी नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भोंदू मनोहर भोसले याच्यावर महिलांवरील अत्याचाराव्यतिरिक्त कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो, असे खोटे आश्वासन देऊन भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचेही आरोप आहेत. अत्याचारप्रकरणी अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. सद्यस्थितीत तो जामिनावर असतानाच कुर्डुवाडी पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले. शनिवारी माढा न्यायालयापुढे सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंग राजपूत, ॲड. पूनम देशमुख यांनी, तर आरोपीतर्फे ॲड. सुभाष हुल्याळकर, रोहित गायकवाड, निखिल पाटील यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा अधिक तपास कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकुळ या करीत आहेत.