IT park File
सोलापूर

Solapur IT park: आयटी पार्क सुरू होण्यासाठी आणखी भक्कम पाऊल

वीज पुरवठ्यासाठी प्रशासनाचा एनटीपीसीसोबत करार; विमानतळ प्राधिकरणाची 59 मीटर उंचीपर्यंत बांधकामास परवानगी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्कला वीज व सौर ऊर्जा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासन व एनटीपीसी यांच्यामध्ये 2 मार्च रोजी सामंजस्य करार झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हा करार अटी व शर्तींच्या अधीन राहून केला असून, आयटी पार्कसाठी आवश्यक ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. त्यामुळे आता आयटी पार्क सुरु होण्याबाबत भक्कम पाऊल पुढे पडत आहे.

तसेच आयटी पार्कसाठी बांधकाम करण्यास सोलापूर विमानतळ प्राधिकरणाने आयटी पार्क परिसरात 59.02 मीटर उंचीपर्यंत बांधकामास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगच्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करण्याबाबतच्या निर्णय राज्य शासन स्तरावरचा असून याची अंमलबजावणी होणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी सांगितले.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाशी झालेल्या दोन बैठकीनंतर कारखान्याने जिल्हा प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळणार आहे. विस्तारीकरण प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर उभा करण्यात येणारा नवीन प्रकल्प हा शून्य द्रव उत्सर्जन यावर आधारित असेल, असे कळविले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी अथवा वायू बाहेर पडणार नाही.

आयटी कंपन्यासाठी कन्सल्टंट कंपनीने होटगी रोड येथील जलसंपदा विभागाची जागा योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. ही जागा जिल्हा प्रशासनाने अंतिम करून त्याबाबत राज्य शासनाला कळवलेले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसीच्या समितीनेही या जागेवर आयटी पार्क करण्याबाबत मान्यता दिलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT