Murder Pudhari
सोलापूर

Solapur murder case: महिलांच्या छेडछाडीवरून एकाचा चाकूने भोसकून खून

आष्टीतील घटना; महिलेसह चौघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : घराबाहेर झोपलेल्या २७ वर्षीय तरुणाला उठवून ‘तू आमच्या घरच्या पोरींची छेड काढतोस, आता तर तू आमच्या बायकांच्याही मागे लागला आहे,’ असा जाब विचारत चाकूने भोसकलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. युवराज अशोक व्यवहारे (रा. आष्टी, ता. मोहोळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील व्यवहारे वस्ती, आष्टी येथे अशोक निवृत्ती व्यवहारे हे पत्नी व मुलगा युवराज यांच्यासोबत राहतात. युवराज याची पत्नी दोन वर्षांपासून नांदण्यास येत नाही. युवराज हा दोन वर्षांपूर्वी खंडाळीजवळील एका जि.प. वस्‍तिशाळेत मुलांना ने-आण करण्याच्या गाडीवर चालक होता. त्यावेळी आष्टीतील भारत शिंदे यांची मुले त्याच्या गाडीमधून शाळेत जात होती. त्याचा शिंदे याची पत्नी सोनाली शिंदे हिच्याशी संपर्क आला होता. तसेच, सोनालीची चुलत बहीण मेघना प्रशांत शिंदे (रा. पेनूर) हिच्याशीही युवराजची ओळख झाली होती. यातूनच एकमेकांशी अधूनमधून बोलणे व भेटणे होत असे. त्यामुळे भारत शिंदे याला युवराजवर सोनालीसंदर्भात संशय होता. त्यातून झालेला वाद मिटवलाही होता. त्यानंतरही युवराज व मेघना हे भेटत होते. यातून मेघनाचा पती प्रशांत शिंदे व युवराज यांच्यात गतवर्षी भांडण झाले होते.

१५ जून रोजी रात्री १२ वाजण्‍याच्‍या दरम्यान युवराज हा घरासमोरील पटांगणात झोपला असताना दत्ता पवार व प्रशांत शिंदे यांनी त्याला आमच्या घरच्या पोरींची छेड काढतोस, बायकांच्याही मागे लागला आहेस, असे म्हणून शिवीगाळ केली. युवराजला प्रशांतने पकडले व दत्ता पवार याने चाकूने त्याच्या छातीवर भोसकले. त्यानंतर दोघे दुचाकीवरून पळून गेले. युवराज जखमी परिस्थितीत वडिलांकडे पळत गेला. त्याला सुरुवातीला आष्टी व नंतर पंढरपूर येथील खासगी हॉस्‍पिटलमध्ये नेण्यात आले; पण युवराजचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी अशोक व्यवहारे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दत्ता अण्णा पवार, प्रशांत शिंदे, अण्णा पवार व आंबिका अण्णा पवार (सर्व रा. पेनूर) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT