सोलापूर

Solapur Drought Situation : माळशिरस, सांगोला, मोहोळ, बार्शी दुष्काळाच्या छायेत

लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहाणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शासनाच्या निकषांनुसार कमी पाऊस आणि पावसातील खंड हे दुष्काळ परिस्थितीचे महत्त्वाचे निकष (ट्रिगर) मानले जातात. सध्या माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि बार्शी हे चार तालुके निकष - १ व निकष - २ मध्ये येऊ शकतात. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

दुष्काळ परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके प्रत्यक्ष शेत-शिवारात उतरविली आहेत. जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, अपर जिल्हाधिकारी चार तालुक्यांची तर निवासी उपजिल्हाधिकारी तीन तालुक्यांची पाहणी करणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व धोत्री तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कर्देहळ्ळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर, नाविंदगी येथे पाहणी केली. त्यांनी पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड, जमिनीतील ओलावा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चारा याबाबत माहिती घेतली.

शासनाकडे जाणार वस्तुनिष्ठ अहवाल

दोन दिवसांत दुष्काळी परिस्थितीशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी त्यांच्या कार्य क्षेत्रात राहून परिस्थितीची माहिती संकलित करतील. प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या अहवालांचे संकलन करून दुष्काळ परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येईल.

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी : आ. कल्याणशेट्टी

आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने दुष्काळाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी आ. कल्याणशेट्टी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT