सोलापूर

Solapur electricity theft: वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून धडक कारवाई मोहीम

मोटारी व स्टार्टर पेट्या केबल वायर जप्त; लोडवर नियंत्रण मिळवण्यासाठी महावितरणची विशेष मोहीम

पुढारी वृत्तसेवा

पिलीव : सध्या शेतीच्या हंगामामुळे शेतीपंपांसाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडून वीजतारांवर अनधिकृत आकडे, हुक टाकून मोठ्या प्रमाणावर वीजचोरी केली जात आहे. या अनधिकृत आणि अतिरिक्त भारामुळे वीज वितरण यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. यामुळे नाईलाजाने महावितरणला सायंकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत सिंगल फेज लोडशेडींग करावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि अनधिकृत वीजचोरीला आळा बसविण्यासाठी महावितरणने वीजचोरांवर कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

सायंकाळची वेळ ही घरात वर्दळीची, स्वयंपाकाची, जनावरांच्या धारा काढण्याची, टीव्ही पाहण्याची आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची असते. नेमक्या याचवेळी 6 ते 10 यावेळेत सिंगल फेज लोडशेडींग होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. विजेअभावी उकाड्याने आणि अंधारामुळे वयोवृद्ध तसेच आजारी माणसांना या लोडशेडींगचा सर्वाधिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाढत्या अनधिकृत लोडमुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे आणि तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आणि प्रामाणिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अकलूज विभागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजचोरांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर थेट धाडी टाकल्या जात आहेत. वीजचोरी उघडकीस आल्यास तत्काळ शेतीपंपाच्या मोटारी आणि स्टार्टर पेट्या (पेटी) जागेवरून काढून जप्त केल्या जात आहेत. ही कारवाई अत्यंत वेगाने सुरू असून यामुळे अनधिकृत वीज वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना वीज पुरवठा राज्य शासन मोफत देत असताना शेतकऱ्यांवरच वीजचोरीच्या कारवाया का, असा संतप्त सवालही शेतकरीवर्गातून विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT