सोलापूर : एकाच सोसायटीतील दोन बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच दोन मोटारसायकली असा सुमारे चार लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दहिटणे परिसरात घडली. याप्रकरणी प्रीती राजेश क्षत्रीय (वय ३६, रा. महालक्ष्मी सोसायटी, दहिटणे रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिटणे रोडवरील महालक्ष्मी सोसायटीमधील प्रीती क्षत्रीय तसेच अनिता शाम कल्पवृक्ष या दोघांचे घर २९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, मंगळसूत्र, कानातील टॉप्स, गळ्यातील माळ, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
प्रिती क्षत्रीय यांच्या घरातील तीन लाख ८० हजार रुपयांचे दागिने तर कल्पवृक्ष यांच्या घरातील ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. तसेच संतोष रामचंद्र त्रिमल व शशिकांत रमशे चव्हाण यांच्या सोसायटी आवारात लावलेल्या दोन दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. सोन्याचांदीचे दागिने व दुचाकी मिळून चार लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.