सोलापूर : पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. डासांमुळे लम्पीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. गाय वर्ग जनावरांना याचा सर्वाधिक धोका असल्याने जिल्ह्यातील गाय वर्ग जनावरांना लम्पीचा डोस दिला जात आहे. आतापर्यंत तीन लाख 15 हजार 22 जनावरांना लम्पीचे लसीकरण केले आहे.
जिल्ह्यात सात लाख 50 हजार गाय वर्ग जनावरे आहेत. त्यातील तीन लाख 15 हजार जनावरांना लंपीचा डोस दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही चार लाख 50 हजार गाय वर्ग जनावरे लंपीच्या लसीकरणापासून वंचित आहेत. त्या जनावरांना तत्काळ लसीकरण करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाकडून सुरू आहे.
जिल्ह्यात गाय वर्ग, म्हैस वर्ग जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लम्पी आजाराचा धोका हा गाय वर्ग म्हणजेच गाय, बैल, कालवड, खोंड या जनावरांना जास्त आहे. त्यामुळे प्राधान्याने गाय वर्ग जनावरांना लम्पीचा डोस देण्यात येत आहे. दरम्यान, लंपी हा आजार संसर्गजन्य आहे. लम्पी झालेल्या जनावरांना डास चावला आणि तोच डास दुसर्या जनावरांना चावल्यास त्या जनावरांना लंपीची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लंपी आजाराची लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांजवळ न बांधता दुसर्या ठिकाणी बांधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
गाय वर्ग जनावरांना लम्पी आजाराची लागण होऊ नये, यासाठी लम्पीचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त जनावरांना लसीकरण केले आहे. उर्वरित जनावरांना लसीकरण सुरू आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यात येईल.- डॉ. विशाल येवले, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन