सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १८) ९९.६८ टक्के मतदान झाले. ६१६ मतदारांपैकी ६१४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, नगरसेवक रूद्रेश बोरामणी हे परदेश दौऱ्यावर आहेत. तर भाजपाचे नगरसेवक दत्तात्रय नडगिरी यांचे निधन झाल्याने या दोघांचेही मतदान होऊ शकले नाही. विजेतेपदाचा फैसला २२ जून रोजी मतमोजणीनंतर होणार असून यात महायुतीचे राजेंद्र राऊत की महाविकास आघाडीचे वसंतनाना देशमुख यांच्यात कोण विजयी होणार याची उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी मतदानात सहभाग नोंदवला. त्यामुळे या निवडणुकीत सुमारे ९९. ६८ टक्के मतदानाची नोंद झाली असून, मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली. बार्शी, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर येथील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली. सर्व केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कमांडो पथकही सज्ज होते. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा नियोजन समितीत उभारलेल्या नियंत्रण कक्षातून सर्व मतदान केंद्रांचे थेट चित्रीकरण पाहत निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच आवश्यक सूचना मतदान केंद्राध्यक्षांना दिल्या.