सोलापूर : शांती चौक येथील दोन एकर जागा लिंगायत समाजातील संस्थेला देण्याच्या मुद्यांवरून लिंगायत समाजात फूट पडल्याचे चित्र असून, आ. देवेंद्र कोठे आणि सिद्धेश्वर देवस्थान यांची कोंडी झाली असून, आता सभागृहात झालेल्या ठरावावर कसा तोडगा काढायचा प्रश्न सत्ताधारी भाजपातील महापौर कोंड्याल यांच्यासमोर उभा राहिला आहे.
शनिवारी सायंकाळी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत अक्कलकोट रोडवरील मठात तातडीची बैठक झाली. यावेळी आ. विजयकुमार देशमुखांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अक्कलकोट रोडवरील शांतीधाम येथील दोन एकर जागा लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्याच्या निर्णयात महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी राजकारण करत लिंगायत समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे.