मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील जाधववस्ती जवळील काटओढा येथील ऊसाच्या शेतात आढळलेले बिबट्याच्या पायाचे ताजे ठसे Pudhari Photo
सोलापूर

Solapur Leopard News | मोहोळ तालुक्यातील वाळूजमध्ये बिबट्याचा वावर; ऊसाच्या शेतात आढळले ठसे, शेतकऱ्यांमध्ये घबराट

वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांचा दुजोरा

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील वाळूज (दे) येथील जाधववस्ती परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ताजे ठसे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने हे ठसे बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वाळूज-कळमण रस्त्यावरील 'काटओढा' परिसरात शुक्रवारी सकाळी पांडुरंग कोळी हे नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी मारुती कादे यांच्या ऊसाच्या शेतातील चिखलात त्यांना प्राण्याच्या पायाचे मोठे ठसे दिसले. त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत सदस्य अमोल कादे यांना याची माहिती दिली. कादे यांनी प्रसंगावधान राखून या ठशांचे फोटो वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवले.

वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी हे ठसे बिबट्याचेच असल्याचा दुजोरा दिला. माहिती मिळताच, वनविभागाचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा

या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत: शेतकऱ्यांनी शेतात एकट्याने जाऊ नये. सोबत काठी ठेवावी. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा आणि मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत. आपली जनावरे सुरक्षित आणि बंदिस्त गोठ्यात बांधावीत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट वनविभागाशी संपर्क साधावा.

" सदरचे ठसे हे बिबट्याचेच आहेत याची खात्री केली आहे.सदर प्राण्याने अद्याप कोणत्याही पाळीव प्राण्यावर किंवा मानवी वस्तीत माणसावर,शेळ्यांवर हल्ला केलेला नाही.अफवांवर विश्वास ठेवू नये. आमची टीम तेथे रवाना झाली आहे व त्यावर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सतर्क रहावे एकट्याने बाहेर पडू नये रात्री आमदारात बाहेर जाण्याचे टाळावे"
योगेश घोडके ,वनाधिकारी (आरएफओ)मोहोळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT