सोलापूर : दुष्काळामुळे लिंबू उत्पादनात घट झाली असतानाच नवरात्रीमुळे मागणी वाढल्याने लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात एका लिंबासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे, ऐन उन्हाळ्यातही लिंबाचे दर इतके वाढले नव्हते. यंदा मात्र नवरात्रीतच सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने लिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक घटल्याने बाजारात लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच नवरात्रोत्सवामुळे धार्मिक विधी, पूजा आणि इतर कारणांसाठी लिंबाची मागणी वाढली आहे. परिणामी, दरवाढीचा भडका उडाला आहे.
बाजार समितीत शुक्रवारी १ हजार ५६४ किलो लिंबाची आवक झाली. यामध्ये उत्तम प्रतीच्या लिंबाला तब्बल १२०० रुपये प्रतिकिलो असा सर्वाधिक भाव मिळाला. सरासरी दर ७०० रुपये, तर किमान दर २५० रुपये प्रतिकिलो नोंदविण्यात आला. उत्पादन घटले, मागणी वाढली आणि दर थेट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे स्वयंपाकात रोज वापरल्या जाणाऱ्या लिंबासाठीही आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.