Legislative Council Election pudhari photo
सोलापूर

Solapur Legislative Council election: विधान परिषद निवडणूक डीसीसी बँकेभोवती फिरणार

एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या 18 जून रोजी मतदान आहे. यात भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी लढत होत आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून डीसीसी बँकेतील कथित गैरव्यवहार, कर्ज थकबाकीबाबत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. डीसीसी बँकेच्या कारभाराभोवतीच ही निवडणूक फिरत आहे.

भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. भाजप आणि महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गट मिळून महायुतीकडे 428 मते आहेत. अंकाच्या संख्याबळ नुसार भाजपचे उमदेवार राजेंद्र राऊत यांचे पारडे जड आहे; परंतु या निवडणुकीत स्थानिक पातळीवर पुढारी हे मतदार असल्याने त्यांना जसा भाव मिळेल, तसे मतदान मिळते. त्यासाठी आतापासून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची जीवनवाहिनी होती; परंतु शेती कर्जासह साखर कारखाने, सूत गिरणी, शैक्षणिक संस्थांना कर्ज वाटप करून अनेकांची थकबाकी राहिल्याने बँक अडचणीत आली. या बँकेचे संचालक जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी होती. ज्यांच्यावर आरोप झाले त्या संचालकांनी चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकण्यापेक्षा भाजपात जाणे पसंत केले. काहींनी रक्कम भरली. काहींच्या चौकशी सुरू झाल्या. न्यायालयीन लढाया लढाव्या लागल्या. कथित गैरव्यवहार समोर आणून चौकशी लावण्यासाठी राजेंद्र राऊत कारणीभूत होते. राजेंद्र राऊत यांनी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढली. त्याचीच निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावरील पोस्टवर चर्चा सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT