बार्शी : अखेर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर बार्शी शहर व तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री पासून सकाळी अकरा वाजेपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील साठवण तलावाची सरासरी चाळीस टक्केच्या आसपास पोचलेली आहे.
हिंगणी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.तर जवळगाव मध्यम प्रकल्पात मध्ये प्रकल्पात 68 टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या पाझर तलावामध्ये 35 ते 40 टक्केच्या आसपास पाणीसाठा उपलब्ध आहे. पाथरी मध्यम प्रकल्प 35 टक्केवर पोहोचला आहे. तालुक्यातील प्रकल्पाचे पाणीसाठा असा - वैराग लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे तर चारे 62 टक्के, गोरमाळे 42 टक्के, कळंबवाडी 90 टक्के, कारी 55 टक्के, काटेगाव 72 टक्के, कोरेगाव 52 टक्के, ममदापूर 48 टक्के, पाथरी 35 टक्के, शेळगाव आर 30टक्के, तावडी 57 टक्के, वालवड 40 टक्के असा पाणीसाठा झाला आहे.
उत्तरमध्ये पावसाने झोडपले
गुळवंची : उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गावात बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपले. तालुक्यातील नान्नज, कारंबा, मार्डी, बानेगाव, भोगाव, रानमसले, गुळवंची, गावडी दारफळ परिसरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.भारी जमिनीतूनही पाणी वाहू लागले. गुळवंची येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने खेड बाळे रस्त्यावर पाणी आल्याने काही काळासाठी वाहतूक बंद झाली होती. बीबी दारफळ येथील 2.89 द.ल.घ.मी. साठवण असणारा गांधी तलाव शंभर टक्के भरल्याने दारफळ रानमसले रस्त्यावरून पाणी वाहू लागले. हिप्परगा येथील एकरुख तलाव नव्वद टक्क्यांपर्यंत भरला असून कालच्या पावसाने एक ते दीड फूट पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
आष्टी तलावात 61 टक्के पाणी
पोखरापूर : गेल्या दोन दिवसांपासून कमी जास्त प्रमाणातील पावसाने शेतकर्यांमध्ये अशा निर्माण झाली आहे. शेती पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस काळ होणे गरजेचे आहे. तरच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरांच्या चार्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.आष्टीच्या ब्रिटिशकालीन तलावात सद्यस्थितीत 61 टक्के पाणी आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील 400 पाझर तलावात जवळपास 50 ते 70 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे.