कुर्डूवाडी : मराठवाडा तसेच विदर्भातून येणार्या वारकर्यांच्या दिंड्या व विविध वाहने कुर्डूवाडी मार्गानेच पंढरपूरला जातात. वाटेतील बावी तसेच रोपळे या दोन गावांत रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वारकरी व वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. पाच वर्षांपासून शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अपघातात अनेक जण ठार झालेले आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत कुर्डूवाडी ते पंढरपूर हा सिमेंटचा तीन पदरी रस्ता सहा वर्षांपूर्वी बनवण्यात आलेला आहे. सुरुवातीपासून हा रस्ता निकृष्ट असल्यामुळे या रस्त्याला जागोजागी मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. ठेकेदाराने या भेगेमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे. रस्त्यावर विविध छोटे-मोठे पूल बांधलेले आहेत. कुर्डूवाडी शेजारील पुलाला तर मोठे भगदाड पडलेले असते, या ठिकाणी हा ठेकेदार वारंवार येऊन हे भगदाड बुजवण्याचा प्रयत्न करतो. सर्वच पूल निकृष्ट जड वाहने जाताना गाड्यांचा मोठा आवाज येतो.
बावी गावाजवळून जाणार्या 100 मीटरचा रस्ता तेथील शेतकर्यांनी अडवलेला आहे, त्याला नुकसान भरपाई न दिल्यामुळे तो तेथील काम होऊ देत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. या ठिकाणी मोठा खड्डा आहे. वाहन वेगाने येऊन त्या खड्ड्यात आदळतात. रस्त्यावरती मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक पालख्या वारकरी यांना या खड्ड्याचा सामना करत वाट काढावी लागते आहे. बावीनंतर पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावाजवळून गेलेला उजनी धरणाच्या लहान कॅनॉलवरील रस्ता आहे. दिवसाही येथील कॅनॉलचा खड्डा दिसत नाही रात्री तर तो दिसतच नाही यामुळे अनेक वाहने भरधाव वेगात येतात व या कॅनॉलमध्ये जाऊन पडतात. यामुळे तर अनेकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे. शासन येथे रस्ता करत नाही. या ठिकाणी किती वारकरी तसेच वाहनधारकांचा बळी आणखी घेतला जाणार आहे, याचे उत्तर जिल्हाधिकार्यांनी द्यावे, अशी मागणी वारकरी व वाहनधारकांमधून होते आहे.