तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात कोजागरी पौर्णिमेसह मातेचा कुलधर्म- कुलाचार पार पाडण्यासाठी रविवारपासून भाविकांची वर्दळ वाढली. आज, सोमवारी सकाळपर्यंत किमान दहा लाखांहून अधिक भाविक तुळजापुरात दाखल होण्याचा अंदाज आहे. मातेचा दरबार ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषानी दुमदुमून गेला आहे. रविवारी कोजागरी पौर्णिमा साजरी होत असताना मातेची मुख्य मूर्ती पलंगावर निद्रिस्त आहे. आज सोमवारी मंदिर पौर्णिमा साजरी होत आहे.
अश्विनी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवार आणि मंगळवार दोन दिवस मातेच्या छबिना मिरवणूक आहे. मिरवणुकीपुढे सोलापूर येथील शिवलाड तेली समाज अंबाबाई मंदिराच्या मानाच्या दोन काठ्या असतील.
सोमवारी नित्य पूजा सकाळी सहा वाजता सुरू होऊन मूर्तीला दुसऱ्यांदा पंचामृत अभिषेक पार पडणार आहेत. सकाळी ११ वाजता सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन मानाच्या काठ्या व पालख्यांचे आगमन होत आहे. या काठ्यांना तीर्थात स्नान घातले जाईल. नंतर बारा लिंगांचे दर्शन घेऊन देवीचे भोपे पुजारी सचिन पाटील व संभाजी पाटील यांच्या घरी मुक्कामी थांबतील. मध्यरात्री १२ वाजता मातेची मंदिर परिसरात काठ्यांसह छबिना मिरवणूक पार पडेल. या मिरवणुकीनंतर मुख्य महंत तुकोजी बुवा यांच्याकडून मंदिर परिसरात मातेचा जोगवाही मागण्यात येतो.
कर्नाटक, आंध्र प्रदेश-तेलंगणासह सोलापूरकरांची पायीवारी
प्रशासनाने सर्व हायवे जड वाहनासाठी शनिवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळपासून बंद केले असून अनवाणी पायीवारी करणाऱ्या भक्तांना वाट मोकळी करून दिली आहे. कोजागरी पौर्णिमेसाठी यावर्षी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणासह सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या नगरीत अनवाणी दाखल झाले आहेत. श्री तुळजाभवानी मातेची निद्रिस्त मुख्य मूर्ती सोमवारी मध्यरात्री एक वाजता सिंहासनावर प्रतिष्ठापित होत असून नित्य पूजेची घाट सकाळी ६ वाजता दिली जाणार आहे. या दरम्यान लाखो भाविकांना मातेच्या अभिषेक, मुख, धर्म दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.