सोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाने चार लाख 99 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या खरीप पेरणी क्षेत्रात वाढ दिसत आहे. कृषी व संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना खते, बियाणे मुबलक प्रमाणात व वेळेवर उपलब्ध करावेत, असे निर्देश कृषी विभागाला दिल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
गत वर्षी चार लाख 17 हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी पेरणी झालेली होती. यंदा पेरणीसाठी आवश्यक असलेली खते व बियाणे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन झालेले आहे. बफर स्टॉक ही उपलब्ध आहे असल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सध्या सोलापूर जिल्ह्याला दोन लाख 51 हजार 900 मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत. अन्य काही साठा उपलब्ध होणार आहे. विक्रेत्यामार्फत विनालिंकिंग शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावेत. जे निविष्ठा विक्रेते लिंकिंग करून शेतकऱ्यांना बोगस खते व बियाणे विकत असतील अशा विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी. यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्यावर त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘एल निनो’ची पंचसूत्री
दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने एल निनो सुरक्षा कवच पंचसूत्री राबवावी. यामध्ये पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पावसाचा खंड व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना जागृत केले जाणार आहेत.