Karmala Car Falls Into Well  Pudahri
सोलापूर

Karmala Accident | राजुरीजवळ अर्धवट रस्त्यामुळे कार विहिरीत कोसळली

राजुरीतील ग्रामस्थांनी दाखवली माणुसकी; दोर व मानवी साखळीच्या मदतीने चालकाला सुखरूप बाहेर काढले

पुढारी वृत्तसेवा

Karmala Car Falls Into Well

करमाळा : सावडी ते वेणेगाव फाटा दरम्यान हॅम (HAM) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याचे अर्धवट काम वाहनचालकांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. रस्त्याचे काम निष्काळजीपणे सुरू असल्याने राजुरी हद्दीत शनिवारी (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव कार थेट रस्त्यालगतच्या उघड्या विहिरीत कोसळली. सुदैवाने ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत चालकाला सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

सध्या या रस्त्याचे काम एका बाजूने सुरू असून, त्या बाजूला रस्त्याचा पहिला थर टाकण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला मात्र रस्ता खोदलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत भरधाव वेगाने येणाऱ्या कारला रस्त्याच्या स्थितीचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत जाऊन पडली.

वाशिंबे येथील रहिवासी आशुतोष शहाजी झोळ हे कारमधून प्रवास करीत होते. कार विहिरीत कोसळली तेव्हा ते वाहनात एकटेच होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी दोर आणि मानवी साखळीच्या मदतीने आशुतोष झोळ यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

अपघातात जखमी झालेल्या झोळ यांच्यावर करमाळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. कारमध्ये एकापेक्षा अधिक प्रवासी असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

दरम्यान, रस्त्याच्या कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणी तातडीने कठडे उभारावेत, आवश्यक ठिकाणी सूचनाफलक लावावेत आणि संबंधित ठेकेदाराला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT