Karmala Khatgaon Electric Motors Stolen
करमाळा: खातगाव हद्दीतील तब्बल शेतकऱ्यांच्या उजनी काठावरील २० शेतकऱ्याचे तब्बल २९ इलेक्ट्रिक शेती पंपांची चोरी झाली आहे. शेतकऱ्यांचे तब्बल १५ लाखांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार आज (दि. १६) सकाळी उघडकीस आला आहे. सततच्या होणाऱ्या मोटार चोरीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
खादगाव परिसरामध्ये महामार्गाला जोडणारा कोमलवाडी भिगवण रस्ता असल्याने या चोऱ्या सतत होत आहेत. याकडे पोलीस प्रशासन मात्र तक्रार देऊनही दुर्लक्ष करीत आहे. उजनी धरण ११७ टक्के भरले आहे. त्यातच सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेती पंपाच्या मोटरी खातगाव जुना रेल्वे पुला लगत ठेवल्या होत्या. परंतु, सोमवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी तब्बल २९ मोटरांचे गोटा पाईप (काळा ) कापून वायर कट करुन चोरी केल्याचा प्रकार खातगाव येथे घडला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून चोरीचे प्रकार वाढले आहेत. पोमलवाडी भिगवण हा रस्ता तयार झाल्यापासून सातत्याने मोटर केबल चोरी जात आहेत . 40 ते 50 हजार रुपये एका मोटरीला खर्च येत आहे. गेल्या वर्षीही नऊ मोटारी चोरीला गेल्या होत्या. गेल्या दोन महिन्यापूर्वी 12 मोटारींची चोरी झालेली आहे. या सर्व चोऱ्यांची तक्रार करमाळा पोलिसांत दिलेली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. -
करमाळा पोलीस तक्रार करूनही दखल घेत नाहीत. चोरी गेलेला माल सापडत नाही. उजनीच्या वाढत्या पाण्यामुळे मोटारी पाण्यातून ओढून खेचून अथक परिश्रमाने घ्याव्या लागत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पिकांना भाव नाही, अनेक अडचणींना, आसमानी, सुलतानी संकटाना तोड द्यावे लागत आहे. त्यात अशा चोऱ्यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. पोलिसांनी तपास करून चोरट्यांना जरब बसवावा.- दिग्विजय कोकरे, शेतकरी खातगाव