करमाळा : येथील कारागृहातील असलेल्या ५४ कैद्यांची कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये ५१ पुरुष व ३ महिला कैद्यांचा समावेश आहे. कैद्यांच्या नातेवाईकांनी या रवानगीच्या वेळी मोठी गर्दी केली होती.
यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, जेलर समीर पटेल, उदय गोडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील, राजेंद्र ढोरे, प्रतापसिंह शेळके, गंगाराम उघडे, हवालदार अशपाक शेख, गणेश शिंदे, आनंद पवार आदी पोलिस व महसूल खात्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.
कारागृहातील गर्दीचे नियोजन आणि कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने राज्यस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार ही कारवाई केली आहे. कायद्यांची संख्या जास्त असल्याने टेंभुर्णी, कुर्डूवाडी येथून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. या स्थलांतरामुळे आता करमाळा उपकारागृहावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
यासाठी ३० पोलिस कर्मचारी व ३ पोलिस अधिकारी अशी एकूण ३३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करमाळा पोलिस ठाण्याच्या आवारातील तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत चार कैद्याच्या खोल्यांमध्ये आता फक्त अवघे सात पोलिस कोठडीतील कैदी आहेत. यामध्ये भोंदू मनोहर मामाचाही समावेश आहे.