सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पूर्वीच्या कारभारातून ज्यांनी डाग लावला, तेच आता बँक आपली असल्याचा दावा करत जिल्हाभर फिरत आहेत. मात्र, चुका करणाऱ्यांना जनता पुन्हा डीसीसी बँकेत संधी देणार नसल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत सहकार विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते नारळ फोडून व आरती करून करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. बबनराव शिंदे, माजी आ. प्रशांत परिचारक, माजी आ. दिलीप माने, माजी आ. राम सातपुते, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सुरेश हसापुरे, नरेंद्र काळे, बाबाराजे देशमुख, विक्रांत पाटील, मनीष देशमुख, सूर्यादित्य साळुंखे, शंभूराजे जगताप, श्रीदीप हसापुरे, दिग्विजय बागल, अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या विकासाची अर्थवाहिनी होती. मात्र, काही लोकांच्या चुकीच्या कारभारामुळे बँकेच्या प्रतिमेला डाग लागला. आता तेच लोक बँकेच्या मालकीचा दावा करीत आहेत. आमचे दहा संचालक बिनविरोध निवडून आले आणि त्याच दिवशी आमचे बहुमत सिद्ध झाले. आमच्या पॅनलचे उमेदवार शंभर टक्के विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बँकेला पुन्हा सक्षम करण्याची गरज
जिल्हा बँकेने आजवर सर्वांना ताकद देण्याचे काम केले आहे. काही चुकीच्या गोष्टी घडल्या असल्या, तरी आता त्या दुरुस्त करून बँकेला पुन्हा सक्षम करण्याची गरज असल्याचे मत माजी आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
पॅनेलच्या पाठीशी उभे राहावे
जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या विकासाची जननी आहे. या बँकेने शेतकर्यांच्या जीवनात क्रांती घडवली आहे. बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सहकार विकास पॅनेलच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.