सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्यात 1,009 कामे मंजूर आहेत. त्यातील 443 पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित 566 पैकी 500 कामे बंद आहेत. ती कामे सुरु करावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिले आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांच्या बिलासाठी जिल्हा परिषदेकडून 82 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, शासनाने फक्त 20 कोटी 13 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला दिला आहे. त्या निधीतून बिलासाठी प्रस्ताव दिलेल्या प्रत्येक ठेकेदाराला 25 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच जलजीवनची कामे तत्काळ सुरु करावीत, असे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील बऱ्याच ठेकेदारांनी अद्यापही कामे सुरु केली नाहीत. त्यामुळे बंद कामे केव्हा सुरु होणार, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत ठेकेदारांना कामे देताना निधी वेळेवर मिळू अथा न मिळो कामे वेळेवर करेन, अशी हमी ठेकेदारांकडून घेण्यात आली होती. तरीही जिल्ह्यातील अनेक ठेकेदार निधी न मिळाल्यामुळे कामे थांबवली आहेत. अशा ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सरंपच, ठेकेदारांतून होत आहे. मात्र, त्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे.
जलजीवन मिशनच्या कामांसाठी 20 कोटींचा निधी आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव आलेल्या ठेकेदारांना 25 टक्क्यांप्रमाणे निधीचे वाटप केले आहे. तसेच बंद असलेली कामे पुन्हा सुरु करावीत, असे आदेश दिले आहेत. पुढील दोन महिन्यांत दोनशे कामे पूर्ण होतील.- संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा