Solapur ITI | दीड वर्षात 2300 नोकरीच्या ऑफर Pudhari Photo
सोलापूर

Solapur ITI | दीड वर्षात 2300 नोकरीच्या ऑफर

शासकीय आयटीआय : विविध कंपन्यांचे 17 नोकरी मेळावे

पुढारी वृत्तसेवा
दीपक शिराळकर

सोलापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आता विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षणच नाही, तर थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या दीड वर्षांत सोलापूर शहरातील दोन प्रमुख शासकीय आयटीआयने केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल दोन हजार 300 विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत.

विजापूर रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (मुलींची) या दोन्ही आयटीआयने मिळून 17 यशस्वी नोकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. ज्यामुळे आयटीआयमधील विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि थेट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळाली. या यशस्वी उपक्रमांमुळे स्थानिक उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत आहे. सोलापूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. आयटीआयच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळत आहे. तसेच बेरोजगारी कमी करण्यातही मोलाचे योगदान मिळत आहे. या मेळाव्यांचे यश पाहता भविष्यात आणखी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे तरुणांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे मत प्रार्चाय सुरेश भालचिम यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

वाढत्या संधीमुळे वाढला कल

नोकरीच्या वाढत्या संधींमुळे यंदा (आयटीआय) अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वर्षी आयटीआय अभ्यासक्रमांसाठी तब्बल पाच हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. रोजगाराभिमुख कौशल्ये शिकता येत असल्याने, कमी वेळात चांगल्या नोकर्‍या मिळवण्यासाठी आयटीआय हे एक उत्तम माध्यम बनले आहे. यामुळे पारंपरिक पदवीऐवजी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

शहरातील शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दीड वर्षात मिळालेल्या 2300 नोकरीच्या संधींपैकी अनेकांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी मिळाली आहे. 17 यशस्वी नोकरी मेळाव्यांमुळे हे शक्य झाले.
- भीमाशंकर कोंडगुळी, कनिष्ठ सर्वेक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT