सोलापूर : सोलापूर शहरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. एकूण चार कारवायांमध्ये साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर अवैध हातभट्टीकरीता लागणारे साहित्य जागेवर नष्ट करण्यात आले.
गुन्हे शाखेचे व. पो. निरीक्षक अरविंद माने यांनी अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथके तयार केली होती. सहा. पोलिस निरिक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने सलगरवस्ती हद्दीतील मौजे कवठे येथे कुमार ऊर्फ बाबू पांडुरंग चव्हाण (रा. भोजप्पा तांडा, ता. उत्तर सोलापूर) याच्या शेतातील अवैध हातभट्टी दारू गाळण्याच्या भट्टीवर छापा टाकुन कारवाई केली. एक हजार 285 लिटर गुळमिश्रीत रसायन व 80 लिटर तयार केलेली हातभट्टी दारू असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यामध्ये संजय गोपीचंद राठोड, कुमार चव्हाण, प्रियंका कुमार चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.