सोलापू्र : शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसरातील श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंड (इको पाँड) ची दुरवस्था झाल्याचे समोर येत आहे. याठिकाणच्या फरशा उखडल्या असून पायऱ्या तुटल्या आहेत. अवघ्या दोन महिन्यांवर गणेशोत्सव आलेला असून त्यापूर्वी याची डागडूजी अत्यावश्यक आहे.
श्री सिद्धेश्वर तलावाच्या इको पाँडची वाढत्या जलप्रदूषणामुळे व सांडपाणी मिसळल्याने दुरवस्था झाली आहे. एकीकडे दूषित पाण्यामुळे तलावातील ऑक्सिजन पातळी अचानक खालावल्याने अनेकदा मासे आणि कासवांचा मृत्यू होण्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे या इको पाँडमध्ये प्रवेश करण्याच्या गणपती घाटाजवळील भागात याच्या पायऱ्यांच्या फरशा निघाल्या आहेत. कठडे तुटले आहेत.
नागरिकांनी तर या पायऱ्या तुटल्याच कशा, असा सवाल उपस्थित केला आहे. कारण या भागात फक्त पालिकेच्या लोकांना जाण्यास मुभा आहे. जनसामान्यांना केवळ अनंत चतुर्दशी दिवशीच जाता येते. मग असे झाले कसे, अशी विचारणा होत आहे.
सजीव सृष्टीच्या संरक्षणासाठी व इको पाँडच्या पुनरुज्जीवनासाठी पर्यावरणप्रेमी सातत्याने आवाज उठवला आहेच. आता गणेशोत्सवापूर्वी ही डागडुजी आवश्यकच आहे.- मधूर सोलापूरकर, पर्यावरणप्रेमी