Liquor  Pudhari
सोलापूर

Solapur Crime : इचगाव टोलनाक्‍यावर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर-मंगळवेढा रोडवरील इचगाव टोलनाक्‍यावर गोवा राज्यातून निर्मित विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले असून, विदेशी मद्याच्या बाटल्यांसह वाहन आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या पथकास माहिती मिळाली की, गोवा बनावटीची दारू घेऊन एक चारचाकी वाहन सोलापूर मंगळवेढा रोडवरून निघाली आहे. ३१ ऑक्‍टोबर रोजी इचगाव टोल नाक्‍यावर या पथकाने वाहन अडवून त्‍याची पहाणी केली. यामध्ये गोवा बनाटीची दारू आढळून आली.

या कारवाईत २३८ बॉक्समधील ७५० मिली व १८० मिली क्षमतेच्या विदेशी मद्याच्या तीन हजार ८८८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच बिअरच्या २६४ बाटल्या, दोन हजार ६८ बल्क लिटर विदेशी मद्य, १३३ बल्क लिटर बिअर आणि चारचाकी वाहन असा एकूण ३० लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राज्‍य उत्‍पादन शुल्‍कचे विभागीय उपायुक्‍त सागर धोमकर, सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके, जवान अनिल पांढरे, चेतन व्‍हनगुंटी, प्रशांत इंगोले, मंगेश मारसिंग आणि स्वप्निल अरमाळ यांनी पार पाडली.

सात महिन्यांत एक हजार ८२५ गुन्हे

दरम्यान, १ एप्रिल २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती, देशी-विदेशी मद्याची बेकायदा विक्री, परराज्यातील मद्याची तस्करी, बनावट मद्यनिर्मिती आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यापक कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण १ हजार ८२५ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १ हजार १९५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाहनांसह सुमारे १० कोटी २२ लाख १७ हजार ७५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT