सोलापूर : बहुप्रतीक्षेत सोलापूर ते हैद्राबाद ही विमानसेवा आजपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी राऊंड टेबल इंडिया, सोलापूर शाखेच्या वतीने सावळेश्वर येथील न्यू समता प्रशालेतील 7 मुली, 3 मुले आणि एका शिक्षकांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाचा अनोखा अनुभव देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाहत होता. फ्लाय 91 विमान कंपनीने ही सेवा सुरू केली.
विमानातील प्रवाशांना मिष्टी मिठाई यांच्या वतीने नाश्त्याचे बॉक्स वाटप करण्यात आले. केक कापून विमानसेवेचे औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास केतन शहा, मनोज क्षीरसागर, योगीन गुर्जर, विजय जाधव, हेमल शहा, राऊंड टेबल इंडिया सोलापूर शाखेचे तरंग शहा, अभिषेक मेहता उपस्थित होते.
या नव्या विमानसेवेच्या प्रारंभामुळे सोलापूरहून हैद्राबादमार्गे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगजगताशी संपर्क साधणे अधिक सोयीचे होणार आहे. परिणामी, आगामी काळात सोलापूरमध्ये उद्योग-व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आठवड्यातून 6 दिवस हैद्राबाद सेवा
सोलापूर ते हैद्राबाद ही विमानसेवा आठवड्यातून शनिवार वगळता सहा दिवस राहणार आहे. दररोज सोलापूरातुन सायंकाळी 3.20 वा. उडान घेऊन 4.30 वा.हैद्राबादला पोहचतील. तर हैद्राबादवरून दररोज सायंकाळी 5 वाजता सुटून सायंकाळी 6 वा.सोलापुरला पोहचतील. तिकिट दर हे 2700 रुपये ते 3700 रुपयेपर्यंत आहे.