सोलापूर : सोलापुरात कायमस्वरूपी डीजेवर 100 टक्के बंदी आणावी या मागणीकरिता गुरुवारी (दि.28) सोलापुरातील विविध 10 शाळा महाविद्यालयातील 2 हजार विद्यार्थी - विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांनी रस्त्यावर उतरून मानवी साखळी करून डीजे मुक्त सोलापूरचा नारा दिला. डीजेमुक्त सोलापूर व्हावे याकरिता सात रस्ता ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली.
दै. पुढारीने सुरू केलेल्या डीजेमुक्त सोलापूरची व्याप्ती आता वाढत चालल्याचे दिसतेय. प्रारंभी मानवी साखळीच्या मार्गावरील सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांचा पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा तसेच सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवी साखळीस प्रारंभ झाला.
सात रस्ता येथून प्रारंभ झालेली मानवी साखळी रंगभवन, होम मैदान, डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे चार हुतात्मा पुतळा परिसरापर्यंत तयार करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डीजे मुक्त सोलापूर झालेच पाहिजे, बंद करा बंद करा कर्णकर्कश डीजे बंद करा अशा घोषणा दिल्या. तसेच डीजे मुक्त सोलापूर झाले पाहिजे या मागणीचे फलक हाती धरले होते.
दिवसभर पडत असलेल्या रिमझिम पावसाच्या सरीतही डीजेमुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत सोलापूरकरांसमोर आर्दश निर्माण केला. त्या विद्यार्थ्यार्ंचे शहरात कौतुक होत आहे. दै. पुढारीने या अगोदर सोलापुरात डीजे बंद व्हावा यासाठी आवाज उठविला होता. त्यामुळे शहरातून दैनिक पुढारीने उठवलेल्या प्रश्नाचे सोलापूरकरांनी कौतुक केले. प्रशासन, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून डीजे बंद होण्याबाबत चर्चा करून त्यावर उपायही सुचविले होते. दै. पुढारीने सुरू केलेल्या या चळवळीला आता यश मिळण्याची चिन्हे आहेत. दै. पुढारीच्या चळवळीच्या माध्यमातून डीजे बंद होण्यासाठी सोलापूरकरांमध्ये जागरूकता येत असल्याचे दिसत आहे.
या शाळा-महाविद्यालयांचा होता सहभाग
मानवी साखळीमध्ये संगमेश्वर महाविद्यालय, सुयश विद्यालय, हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूल, रॉजर्स स्कूल, मेरी बी हार्डिंग स्कूल, हरिभाई देवकरण प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सेवासदन प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला अशा 10 शाळा आणि महाविद्यालये सहभागी झाली होती.