सोलापूर

Solapur News: होटगी रस्ता काँक्रिटीकरणास स्थगिती

महापालिका विरूद्ध एमएसआरडीसी आमने-सामने

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : होटगी मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणास परवानगी दिली नसल्याचे सांगत महापालिकेने मंगळवारी (दि. ४) तात्पुरती स्थगिती दिली. महापौर विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेचे गटनेते नरेंद्र काळे यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, याविषयी दै. ‘पुढारी’ने संबंधित कामाचे मक्तेदार विशाल देशमुख यांना संपर्क केला असता, ते म्हणाले, याविषयी आम्हाला काहीच कल्पना नाही. महापालिकेतील बैठकीत मक्तेदारपैकी कुणी उपस्थित नव्हते. त्यामुळे याविषयी आम्हाला काही कल्पना नाही.

महापालिका हद्दीत महिला हॉस्पिटलपासून सुरू होणाऱ्या पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी एमएसआरडीसीने महापालिकेची परवानगी घेतली नाही. आवश्यक समन्वय न साधता एमएसआरडीसीने महापालिकेच्या हद्दीत काम सुरू केल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. पालिकेने सूचना व पत्रे देऊनही संबंधित मक्तेदाराने काम सुरूच ठेवल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

त्यामुळे मूलभूत सुविधा पूर्ण होईपर्यंत या कामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त, महापौर आणि सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच चार ते पाच ठिकाणी क्रॉस ड्रेनची व्यवस्था करणे, अप्रोच रोडचे काम पूर्ण करणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची खात्री झाल्यानंतरच काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे महापालिकेच्या बैठकीत ठरविले.

या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता उमेश झगडे, उपायुक्त गिरीश पंडित, नगरसेवक सात्विक बडवे, शिवाजी वाघमोडे, वैभव हत्तुरे, दीपक जमादार, जयकुमार माने, अझहर हुंडेकरी, अझरुद्दीन जाहगीरदार, संगीता जाधव, आनीसा मोगल, सफिया चौधरी, अधिकारी प्रवीण जोशी, सय्यद पिरजादे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT