LPG Cylinder Pudhari
सोलापूर

LPG cylinder shortage: सोलापुरातील 2,500 हॉटेल्स गॅस टाक्यांअभावी बंद पडणार

आखाती युद्धाचा फटका; सोलापूर हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचा दुजोरा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अमेरिका, इस्राईल विरुद्ध इराण युद्धामुळे व्यावसायिक गॅस टाक्या उपलब्ध होण्यात अडचणी येऊ लागल्याने सोलापूर शहरातील तब्बल अडीच हजार हॉटेल्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यास सोलापूर हॉटेल व्यावसायिक असोसिएशनने दुजोरा दिला आहे.

अमेरिका, इस्राईल विरुद्ध इराण युद्धाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. सोलापूर शहरातील हॉटेल व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शासनाकडून व्यावसायिक गॅस टाक्या पुरवठ्यावर निर्बंध आणण्याचे निर्देश दिल्याने शहरातील पुरवठादारांनी व्यावसायिक गॅस टाक्यांचा पुरवठा तात्पुरता बंद केला आहे. याचा फार मोठा फटका हॉटेल इंडस्ट्रीला बसला असून, व्यावसायिक गॅस टाक्यांचा पुरवठा न झाल्यास हॉटेल व्यवसाय बंद करावा लागेल, असे मत हॉटेल व्यावसायिकांचे आहे.

सोलापूर शहरात दररोज अंदाजे चार हजार व्यावसायिक गॅस टाक्यांची गरज भासते. शहरातील लहान-मोठ्या मिळून सुमारे दोन ते अडीच हजार हॉटेल व्यावसायिकांचा स्वयंपाक या व्यावसायिक गॅस टाक्यांवरच अवलंबून आहे. प्रत्येक हॉटेलला दररोज किमान तीन ते चार व्यावसायिक गॅस टाक्यांची आवश्यकता असते. मात्र त्याचा सध्या पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांपुढे संकट उभारले आहे.

ज्यांच्याकडे काही प्रमाणात व्यावसायिक गॅस टाक्यांचा साठा आहे, ते हॉटेल जेमतेम एक दिवस सुरू राहू शकतील. आज बुधवारी व्यावसायिक गॅस टाक्यांचा पुरवठा झाला नाही तर शहरातील बहुतांश हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील खानावळी, उपाहारगृहे आणि रेस्टॉरंट व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT