सोलापूर

Solapur News: सोलापुरातील हॉटेलमध्ये पंजाबी-चायनीज डिशेस बंद

महाराष्ट्रीयन थाळीला प्राधान्य; सात परिसरातील हॉटेल बंद केल्यास वस्ताद, वेटर निघून जाण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आखाती देशांमधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका आता सोलापूर शहरातील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. शहरात व्यावसायिक वापरासाठी मिळणाऱ्या गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक हॉटेलांनी पंजाबी, चायनीजसह जादा गॅस लागणाऱ्या विविध डिशेस बंद केल्या आहेत. परिणामी, अनेक हॉटेलांमध्ये आता केवळ महाराष्ट्रीयन थाळी किंवा कमी गॅस लागणारे पदार्थ देण्यावर भर दिला जात आहे.

गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शहरातील काही मोठ्या हॉटेल व्यवसायिकांच्या दहा-दहा शाखा असून त्यांना दररोज 50 ते 70 गॅस सिलिंडरची आवश्यकता असते. मात्र सध्या आवश्यक तेवढा गॅस उपलब्ध होत नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरची व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी काही हॉटेल चालकांनी इंडक्शन कुकर, कोळसा भट्टी अशा पर्यायी साधनांचा वापर सुरू केला असला तरी त्यातून अपेक्षित वेगाने सेवा देणे कठीण जात आहे. त्यातच पंजाबी आणि चायनीज डिशेस बंद केल्यामुळे ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे हॉटेलचे रोजचे उत्पन्न घटले असून कामगारांचा पगार, इतर खर्च भागवणे हॉटेल मालकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. एलपीजी पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर काही हॉटेलांना तात्पुरते शटर खाली ओढण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही शहरातील व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

ग्राहक कमी होण्याची शक्यता

हॉटेल व्यवसायात काम करणारे अनेक वस्ताद, वेटर व कामगार हे बाहेरगावचे असल्याने रोजगार अनिश्चित झाल्यास ते परत जाण्याची भीती देखील निर्माण झाली आहे. जर कुशल कर्मचारी निघून गेले तर भविष्यात हॉटेलमधील चव आणि दर्जावर परिणाम होऊन ग्राहक आणखी कमी होण्याची शक्यता असल्याची चिंता हॉटेल चालक व्यक्त करत आहेत.

आमच्या शहरात दहा शाखा आहेत. दररोज 50 व्यावसायिक सिलिंडरची गरज असते. तर एक हजारच्या आसपास कर्मचारी आहेत. दोन तीन दिवस पुरेल इतका गॅसचा साठा आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर हॉटेल बंद करावे लगणार आहे. हॉटेल बंद केल्यास वस्ताद, वेटर निघून जाण्याची भीती आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यावा, मोठा संभ्रम आहे.
सुनिल ठेंगिल , हॉटेल व्यवसायिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT