सोलापूर : हॉटेल व खानपान क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकराने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरांमध्ये महत्त्वपूर्ण कपात केली आहे. रेस्टॉरंट, टेकअवे व बाहेरील केटरिंग सेवांवर येत्या 22 तारखेपासून फक्त पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. यामुळे ग्राहकांच्या वास्तव्याचे, जेवणाचे बिल कमी होणार आहे. याचा सोलपूरच्या हॉटेल व्यवसायाला चांगलाच बुस्टर डोस मिळणार आहे.
हॉटेलमधील खानपान सेवेसाठी खोलीच्या दरानुसार वेगवेगळे दर लागू होणार आहेत. साडेसात हजार रुपयांपर्यंत दर असणार्या खोलीमध्ये जेवण घेतल्यास पाच टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यापेक्षा जास्त दर असणार्या खोलीमध्ये दिल्या जाणार्या खानपान सेवांवर मात्र 18 टक्के जीएसटी कायम राहणार आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी अनेक खाद्य सेवांवर 12 ते 18 टक्के जीएसटी लागू होत होता. नव्या निर्णयामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे पर्यटन व आतिथ्य उद्योगाला गती मिळेल असा अंदाज सोलापुरातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
हॉटेल रूम व खानपान सेवांवरील जीएसटी कमी केल्यामुळे लहान आणि मध्यम हॉटेल व्यवसायाला बुस्टर मिळेल. जीएसटी कमी करण्याचा केंद्राचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे मध्यम व लहान हॉटेलवरील कराचा बोजा कमी होणार आहे.- ऋत्विज चव्हाण, हॉटेल व्यावसायिक