संगमेश जेऊरे
सोलापूर : मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, कुसुमाग्रज यांच्या कवितेतील वस्तुस्थिती सध्या सीना नदीकाठी तंतोतंत दिसून येत आहे. महापुरात घरे, दारे वाहून गेल्याने अल्पभूधारक, बागायतदार शेतकर्यांसह सर्वच लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीवर तात्पुरते छत उभारून संसार मांडला आहे.
हे चित्र आहे, सीना नदीकाठी कोर्सेगांवच्या रहिवासी असलेल्या ब्रह्मदेवनगर येथील सुमारे 20 कुटुंबांची आहे. हीच स्थिती सीना नदीकाठच्या शेतकर्यांचीही बनली आहे. सीनामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारख होतं नव्हतं सगळं महापुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.
उमदी, मैंदर्गी असे सुमारे 300 लोकवस्तीचे ब्रह्मदेव नगर. 23 सप्टेंबर रोजी पुराचे पाणी घरात घुसले. घरातील साहित्यही घेण्याची उसंत मिळाली नाही. इतक्या वेगात घरात पाणी शिरले होते. बघता बघता शेती पिकांसह घरातील धन- धान्य, कपडे-लत्ते, अंथरुण-पांघरुण वाहून गेले. जनावरांना सोबत घेऊन मिळेल त्या मार्गाने उंचवटा भागावर आले. शेतातील घरे पाण्यात बुडाली, गावात राहायला घरे नाहीत, पाहुण्यांकडे जाण्यासाठी पुराच्या पाण्याने रस्ते बंद झाले. अशा परिस्थितीत काहींनी प्लास्टिकच्या ताडपत्रीचे तंबू मारले. ट्रॅक्टरच्या ट्रेलरला प्लास्टिकचे ताडपत्री मारून त्याला तात्पुरता आश्रय तयार केला. वरून संततधार पाऊस, खवळलेली सीना नदी, मानवी रक्त गोठणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत लहान लेकरांसोबत जीवन कंठावे लागत आहे. अंगावर घालण्यासाठी उबदार कपडेही नाहीत, चादर, ब्लँकेटही नाही. हे देवा इतकी सत्त्वपरीक्षा घेऊ नको.. अशीच आर्त प्रार्थना देवाकडे करत आहेत.