सोलापूर : शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून पारा जवळपास चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे. एप्रिल अखेर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेने विशेष खबरदारीची पावले उचलली आहेत.
राज्य शासनाकडून महापालिकांच्या आरोग्य विभागांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उष्माघात ही जीवघेणी परिस्थिती ठरू शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते.
शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास आणि शरीराला थंड होण्याची क्षमता कमी पडते तेव्हाच्या स्थितीला उष्माघात असे म्हटले जाते. परिस्थिती अधिक गंभीर होते. याच अनुषंगाने सोलापूर महापालिकेने शहरातील विविध 15 आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवले आहेत. उष्माघाताचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्याच्या सूचना संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
असे करावेत प्राथमिक उपचार
रुग्णाला थंड व सावलीच्या ठिकाणी हलवावे.
कपडे सैल करावे, शरीर थंड करण्यास मदत करावी.
थंड पाण्याने अंग पुसावे व ओल्या कापडाने शरीरावर शेक द्यावा.
रुग्ण शुद्धीवर आल्यास थोडे थंड पाणी, ओआरएस द्यावे.
रुग्ण बेशुद्ध अथवा गंभीर लक्षणे असल्यास रुग्णालयात तत्काळ दाखल करावे.
उष्माघाताची लक्षणे
शरीराचे तापमान 40 पेक्षा जास्त होणे
डोकेदुखी व गरगरणे
अंगामध्ये अशक्तपणा व थकवा जाणवणे
घाम येणे बंद होणे, त्वचा कोरडी व तापलेली असणे
गोंधळलेली अवस्था अथवा शुद्ध हरपणे
जलद नाडीचे ठोके आणि श्वासोच्छवास