सोलापूर : महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या दुसऱ्या दिवशीच्या आढावा बैठकीत आरोग्य विभागाचा पंचनामा करण्यात आला. आरोग्य विभागामध्ये प्रसूतीगृहात डॉक्टर आणि औषधे उपलब्ध नाहीत. इतर दवाखान्यात महिला रुग्णांना पाठविले जाते. हद्दवाढ भागातील घंटागाड्या मिनिटाला बंद पडतात. विशेष म्हणजे नव्या घंटागाड्याही बंद पडत असल्याचा आरोप करत घनकचरा विभागाचे देखील पोस्टमार्टेम केले.
महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय आढावा बैठक पार पडली. मंगळवारी मंडई व कोंडवाडा विभाग तसेच आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागांचा आढावा घेण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहर अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक, नगरसेविका व संबंधित विभागांचे अधिकारी यांच्या माध्यमातून अंदाजपत्रकाचा विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे. या विभागातील प्रशासनाचे नियोजन आणि वास्तवातील अडचणी सदस्यांनी मांडल्या.
महापालिकेची आरोग्य सेवा कोलमडली आहे. दवाखान्यात औषधे नाहीत. ॲम्बुलन्स सेवाही उपलब्ध केली जात नाही. पाच कोटीचा निधी पोर्टा केबिनसाठी मिळाला. मात्र या केबिन जिथे आवश्यकता आहे, त्याठिकाणी न बसवता आरोग्य केंद्र असलेल्या परिसरातच बसवण्यात आल्या आहेत. केवळ निधी खर्च घालण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप करण्यात आला. आपला दवाखानासाठी शहरात एका ठिकाणी जागा देणगीपोटी दिली असतानाही त्याठिकाणी दवाखाना अद्याप सुरू केला नाही. याकडे नगरसेवक अनंत जाधव यांनी लक्ष वेधले.
महापालिका आरोग्य दवाखाना आणि प्रसूतीगृहामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. भूलतज्ज्ञ नाहीत. प्रसूतीगृहामध्ये रात्रीच्या वेळी महिला रुग्णांना इतर दवाखान्यात पाठविण्यात येते. नियुक्त केलेले डॉक्टर्स उपलब्ध नसतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केले. प्रभाग 26 मध्ये तर मिनिटाला घंटागाड्या बंद पडतात. नागरिकांना त्या ढकलाव्या लागतात. विशेष म्हणजे नव्या घंटागाड्या बंद पडत असल्याचे सांगण्यात आले.