सोलापूर

सोलापूर : फॅक्टरीसाठी एक कोटी आण म्हणत सॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेचा छळ

मोहन कारंडे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पॉवरलूमची फॅक्टरी काढण्यासाठी माहेरून एक कोटी रुपये आणावेत म्हणून पत्नीचा छळ करणार्‍या उच्चशिक्षित पतीसह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रावणी प्रेम पोटाबत्ती (28, रा. श्रद्धा अपार्टमेंट, पहिला मजला फ्लॅट नं. 2, पद्मनगर, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती, सासरे श्रीनिवास पोटाबत्ती, सासू ज्योती पोटाबत्ती (तिघे रा. सृष्टी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच तो ही उच्च शिक्षित घराण्यात असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

श्रावणी व प्रेम यांचा विवाह 2020 मध्ये झाला आहे. श्रावणी या पुण्यातील एंट्राटा इंडिया कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. प्रेम हे नोकरीनिमित्त गुरगाव (हरियाणा) येथे असतात. श्रावणीच्या आई- वडिलांनी संसारोपयोगी साहित्यासह सुमारे 15 लाख रुपये खर्चून दोघांचे लग्न लावून दिले.र पुढे लग्नानंतर श्रावणी हिस प्रेम हे गुरगाव येथे घेऊन गेले. तेथे तिचा छळ सुरू केला. माहेरून 1 कोटीग रुपये घेऊन ये, सोलापुरात पॉवरलूम फॅक्टरी खरेदी करून व्यापार धंदा करतो, तू मला पसंद नव्हती, तुझ्या वडिलांची आम्हाला आर्थिक मदत होईल म्हणून तुझ्याशी लग्न केले आहे, असे म्हणून श्रावणीला त्रास दिला. तुझ्या आई- वडिलांनी लग्नात 20 तोळ्याऐवजी 15 तोळे सोन्याचे दागिने दिले, आमचा अपमान केला आहे, वडिलांची अब्रू जाऊ नये असे वाटत असेल तर तसेच तुला नांदायचे असेल तर तुझ्या वडिलांनी आम्हाला आर्थिक मदत केल्याशिवाय आम्ही नीट नांदविणार नाही असे म्हणून श्रावणीचा शारीरिक व मानसिक छळ केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

सासरी नांदत असताना माझ्या पती, सासू, सासर्‍यांनी माझ्या घरच्यांना फोनवरून बोलू दिले नाही. म्हणून मला का त्रास देता असे विचारले असता तू आम्हाला तुझ्या वडिलांकडून आर्थिक मदत मिळवून दे, तेव्हाच आम्ही तुला व्यवस्थित नांदवू अशी धमकी दिली. तसेच माझी शैक्षणिक कागदपत्रे, बँक पासबुक व इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे सासर्‍यांनी म्हणजे श्रीनिवास पोटाबत्ती यांनी स्वतःजवळ ठेऊन घेतली. तसेच एकदा मी पती प्रेम यास प्रेम या नावाने हाक मारली असता त्याने चिडून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोपही विवाहितेने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार साळुंखे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT