सोलापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक तसेच कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाबाबत योग्य नियोजन करावे. भारनियमनाची आवश्यकता असल्यास नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, तसेच आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशा सक्त सूचना पालकमंत्री गोरे यांनी महावितरणला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील विद्युत भारनियमनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी शनिवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या भारनियमनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मागील दोन दिवसांत अनुक्रमे चार आणि सहा तास आपत्कालीन भारनियमन करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली. यावर पालकमंत्री गोरे यांनी नाराजी व्यक्त केली.