अंजनगाव खेलोबा : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अंजनगाव खेलोबा परिसरातील भूजल पातळीत मोठी घट झाली असून, त्याचा गंभीर फटका शेती व्यवसायाला बसत आहे. परिसरातील तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धडपड सुरू असून, पाण्याअभावी उभी पिके वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
पूर्वी १५० ते २०० फूट खोलीवर पाणी लागणाऱ्या बोअरवेलसाठी आता ४०० ते ७०० फूट खोदकाम करूनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. नवीन बोअरवेल घेऊनही सुमारे ९५ टक्के बोअरवेल अपयशी ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही पदरी निराशाच पडत आहे.
पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी रब्बीची पेरणीच टाळली आहे. तर दुसरीकडे डाळिंब, द्राक्ष, बोर आणि केळी यांसह इतर फळबागांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नवीन बोअरवेल घेण्यासाठी शेतकरी सोन्याचे दागिने गहाण ठेवत आहेत. काहीजण हातउसने पैसे घेत असून, तर काही शेतकरी बँकांकडून कर्ज काढून पाण्याचा शोध घेत आहेत. एका बोअरवेलसाठी सुमारे ६० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. मात्र, बोअरवेल कोरड्या निघाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडत आहे. शेती वाचविण्यासाठी केलेला खर्च वाया जात असून, कर्जाचा बोजा मात्र वाढत आहे.