उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये द्राक्षाच्या खरड छाटणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्याने पुन्हा एकदा नव्या जोमाने आपले शेतातील कामकाज सुरू केले आहे. निसर्गाने चांगली साथ दिली तर चांगले उत्पादन पदरात पडेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी नव्या हंगामाची सुरुवात केली आहे.
मागीलवर्षी जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला होता. यापूर्वी झालेले सर्व विक्रम मोडीत काढत पावसाने धुवाँधार बॅटिंग केली होती. त्यामुळे जिल्ह्यात द्राक्षाच्या उत्पादनात जवळपास 35 टक्केहून अधिक प्रमाणात घट झाली आहे. त्याचा मोठा आर्थिक खटका शेतकऱ्यांना बसला आहे. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट ओढवले आहे. यंदाचा द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यातच नव्या हंगामाची सुरुवात काही ठिकाणी सुरू झाली आहे. नव्या हंगामाचा पहिला भाग म्हणजे द्राक्षाची खरड छाटणी होय. या छाटणीला उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये सुरुवात झाली आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात मे च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खरड छाटणीस सुरुवात केली आहे. जेणेकरून फळ छाटणीपूर्वी आपल्या द्राक्ष बागेच्या काड्या व्यवस्थित तयार होऊन चांगल्या प्रकारे गर्भधारणा होईल, अशी अपेक्षा त्यामागे शेतकऱ्यांची आहे. दरम्यान, शेतीपुढे मनुष्यबळाचे संकट उभे ठाकले आहे. काहीही झाले तरी शेतमजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यावर मात करत शेतकरी पुन्हा नव्या आशेने, नवीन उमेद डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल सुरू करत आहे.