Solapur News | द्राक्षांवरील आपत्तीला प्लास्टिक कव्हरचा आधार Pudhari Photo
सोलापूर

Solapur News | द्राक्षांवरील आपत्तीला प्लास्टिक कव्हरचा आधार

राष्ट्रीय कृषी विकास योजना : शेतकर्‍यांना मिळणार दोन लाख 40 हजारांचे अनुदान

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाच्या लाभासाठी शेतकर्‍यांना राज्य शासन अनुदान देणार आहे. अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, जालना व धाराशिव या आठ जिल्ह्यांतील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना दोन लाख 40 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. द्राक्षांवरील आपत्ती टाळण्यासाठी शेतकर्‍यांना प्लास्टिकचा कव्हर आधार म्हणून असणार आहे.

द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आर्थिक बळ देणारे महत्त्वाचे फळपीक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांना संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनिधीद्वारे सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा प्रकल्प द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता महाडीबीटी प्रणालीवर आता योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यास 2025-26 साठी 13.20 हेक्टर क्षेत्रावर लाभ घेता येणार आहे. त्यासाठी 79 लाख 46 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

द्राक्ष पिकांसाठी एकरी लाखो रूपयांचा खर्च असून, नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय हवामानातील बदलामुळेही पिकांची गुणवत्ता खराब होते. बाजारात अपेक्षेप्रमाणे भाव नाही मिळाला तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. त्यामुळे शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांसाठी द्राक्षांवर प्लास्टिकच्या कव्हरचा आधार दिला आहे.

एकरी पावणेपाच लाखांचा खर्च

अर्धा ते एक एकर दरम्यान प्रति शेतकर्‍यांना लाभ दिला जाणार आहे. प्रति एकर चार लाख 81 हजार 344 रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी शेतकर्‍यांना दोन लाख 40 हजार 672 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा ही कागदपत्रे लागतील.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT