सोलापूर : शहर-जिल्ह्यात गतवर्षी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यातील 420 पीडितांना सात कोटी 28 लाख 75 हजार रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्यांचे प्रमाण हे माळशिरस तालुक्यातील आहेत.
गेल्यावर्षी शहर-जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमातीतील 420 पीडितांची संख्या आहे. यांच्यावर अन्य समाज घटकातील लोकांकडून जातीय द्वेषातून इजा करणे, त्रास, अपमान, नग्न धिंड काढणे, घरास आग लावणे, महिलांचा विनयभंग करणे, महिलांचा लैंगिक छळ करणे आदी प्रकारच्या गुन्ह्यातील पीडितांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. याच प्रकरणातील 420 पीडितांना आर्थिक सहकार्यासाठी अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार मागील आर्थिक वर्षात सात कोटी 28 लाख 75 रुपयांचे अनुदान प्राप्त होताच त्याचे वाटप केले. शहर जिल्ह्यातील या गुन्ह्यातील पीडितांना मुख्यालयाकडून आलेली रक्कम त्यांनी दिलेल्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
अॅट्रॉसिटी दाखल झालेल्या गुन्ह्याचा अहवाल या कार्यालयाला प्राप्त झाला की, त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली जाते. वरिष्ठ कार्यालयाकडून जसे अनुदान प्राप्त होते, तसे संबंधित पीडितांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले जातात.- सुलोचना सोनवणे-महाडिक, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय