सोलापूर : जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर, मातोश्री, जयहिंद आणि गोकुळ साखर कारखान्यांकडे एफआरपी थकली होती. त्यातील श्री सिद्धेश्वर आणि जयहिंद कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांचे ऑडिट सुरू आहे. गोकुळ आणि मातोश्री साखर कारखान्यांकडे एफआरपी थकली आहे. त्यांच्यासह इतर कारखान्यांचा गाळप परवाना थांबविण्यात आला आहे. मात्र, तरीही त्यातील काही कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केले आहेत.
जिल्ह्यातील एकूण 34 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यातील 27 कारखान्यांचा गाळप परवाना मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित सात कारखान्यांचा गाळप परवाना अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तरीही एक ते दोन कारखाने अपवाद वगळता इतर सर्व कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केल्याचे दिसत आहे.
ऊस गाळप हंगामास सुरुवात होऊन महिना संपला तरी जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्याच्या लगतच्या सर्व जिल्ह्यात कारखानदारांनी उसाचे दर जाहीर केले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच करमाळा तालुक्यातील पांडे येथील खासगी कारखान्याने दोन हजार 800 रुपयांचा दर जाहीर केला आहे. मात्र हा दर लगतच्या जिल्ह्यांपेक्षा तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी आहे. साहजिकच शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी थकविली आहे. तसेच ऊस दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केले आहे. जिल्हाधिकारी यांनी ऊस दर जाहीर करण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे एफआरपी थकविणाऱ्या आणि ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.-विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एफआरपी थकवली होती. त्यातील श्री सिद्धेश्वर आणि जयहिंद कारखान्यांनी थकीत एफआरपी दिल्याचे सांगत आहे. त्यामुळे त्या कारखान्यांचे ऑडिट सुरू आहे. तर गोकुळ आणि मातोश्री साखर कारखान्यांकडे एफआरपी थकली आहे. त्यांचा गाळप परवाना थांबविण्यात आला आहे.-प्रकाश आष्टेकर, प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग