सोलापूर

Gokul Sugar Factory : गोकुळचा तिढा सुटला, बिले न मिळाल्‍यास कारखाना बंदचा इशारा ​

कारखान्याकडील थकीत बिलांबाबत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता

पुढारी वृत्तसेवा

​सोलापूर : गोकुळ शुगरच्या (सध्या ओंकार ग्रुप) सन २०२३, २०२४ व २०२५ मधील थकीत ऊस बिलांच्‍या प्रश्नावर आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांच्‍या मध्यस्‍थीमुळे अखेर तोडगा निघाला आहे. येत्‍या सात दिवसात शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले वाटप होणार आहेत. सात दिवसात बिले न मिळाल्‍यास पुन्‍हा कारखाना बंद पाडण्याचा इशारा धाराशिव व सोलापूर जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

कारखान्याकडील थकीत बिलांबाबत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर आ. कल्याणशेट्टी यांनी कारखाना प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीस ओंकार शुगरचे जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड, शेतकरी नेते अरविंद घोडके, गणेश नरे, ऊस उत्पादक शेतकरी गंगाधर जाधव, शिवानंद जोजन, दयानंद बिडवे यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी सण-उत्सव, शेतीची आगामी कामे आणि कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी थकीत बिले तातडीने मिळणे गरजेचे असल्याच्या भावना मांडल्या. शेतकऱ्यांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन आ. कल्याणशेट्टी यांनी कारखाना प्रशासनाशी सविस्तर चर्चा करत मार्ग काढण्याची सूचना केली.

​या चर्चेअंती ओंकार शुगरचे जीएम गायकवाड यांनी येत्या पाच दिवसांपासून २०२३, २०२४ आणि २०२५ या तीनही हंगामातील थकीत ऊस बिलांच्या वाटपाला सुरुवात केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही दिली. ठरलेल्या नियोजनानुसार सर्व शेतकऱ्यांची देणी टप्प्याटप्प्याने अदा केली जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

​आ. कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या आक्रमक आणि सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. लोकप्रतिनिधी आणि कारखाना प्रशासनाच्या समन्वयातून थकित बिलांचा तिढा सुटल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांच्‍या मध्यस्‍थीमुळे गोकुळकडील थकीत ऊस बिलाचा तिढा सुटला आहे. येत्‍या सात दिवसात बिले देऊ, असे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दिलेल्‍या मुदतीत बिले न दिल्‍यास पुन्‍हा कारखाना बंद पाडणार आहे.
- अरविंद घोडके, शेतकरी नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT