सोलापूर : सोलापूर ते गोवा ही इंडिगो कंपनीची विमानसेवा रविवारी रद्द झाली. या प्रकारामुळे संतप्त होऊन प्रवासी आपापल्या घरी परतले. विमानसेवा रद्दच्या प्रकारामुळे विविध शहरातील विमानतळावरील तसेच इंटरनॅशनल विमानतळावरील प्रवासी आधीच वैतागले आहेत. अशाच विस्कळीत परिस्थितीचा अनुभव सोलापूरच्या प्रवाशांना यानिमित्ताने मिळाला.
गोव्यावरून येणारे विमान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून आलेच नाही. त्यामुळे रविवारी गोव्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांना मार्ग बदलावा लागला. काहींना प्रवास रद्द करावा लागला तर काही प्रवासी उद्याच्या विमानाने येण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या प्रवाशांना रविवारची सेवा पुढे मिळण्याची शक्यता आहे.
उदभवलेल्या परिस्थितीमुळे सोलापूर विमानतळावरती बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता. फ्लाईंग कंपनीच्या लोकांनी विमान तांत्रिक बिघाडामुळे सोलापूर गोवा विमान सेवा रद्द झाल्याचे ऐनवेळी सांगितले. त्यामुळे सोलापूरच्या प्रवाशांना गोव्याला जाण्याचे ऐनवेळी रद्द करावे लागले. विमानकंपनीच्या विस्कळित सेवेवर ताशेरे ओढत अनेक प्रवासी परतले.