सोलापूर : सोलापूर-गोवा विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. तर सोलापूर-बंगळुरु, तिरुपती, हैदराबादला विमानसेवा सुरु करण्याची मागणीकडे दुर्लक्षच आहे. त्यामुळे ही विमानसेवा केवळ मृगजळच ठरत आहे.
विमानसेवा कंपन्यांकडून जूनमध्ये नाईट लॅडींग, दृश्यमानतेचे कारण पुढे करुन विमानसेवा बंद केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु झाली असली तरी उर्वरित विमानसेवा सुरु झाल्या नाहीत. हैदराबाद हे सोलापूरसाठी व्यावसायिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. काही काळ सोलापूर-हैदराबाद सेवा उपलब्ध होती; मात्र मान्सून काळात ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जूनमध्ये कंपनीने सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद सेवा तीन महिन्यांसाठी स्थगित केली आहे. यामुळे सोलापूरहून बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहे. तर मुंबई विमानसेवा १ ऑगस्टपासून पुन्हा सुरू झाली आहे. ती आठवड्यातील सातही दिवस नियमितपणे सुरु करण्याची मागणी होत आहे.
मागील उन्हाळ्यात गोवा हाऊसफुल्ल
सोलापूर-गोवा विमानसेवा जून २०२६ मध्ये बंद पडली आहे. जूनच्या सुरुवातीला या मार्गावर वर्षभरात १४ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळी सुट्यांच्या काळात तर ही सेवा हाऊसफुल्ल होती आणि तिकीटदरही वाढले होते. मात्र जूनमध्येच ही सेवा बंद झाली. ती अजून सुरू झालेली नाही.
पर्यटनासाठी महत्त्वाचे केंद्र
सोलापूर हे औद्योगिक, व्यापारी आणि धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांमुळे देशभरातून प्रवासी सोलापूरमध्ये येतात. त्यामुळे सोलापूर विमानतळाला केवळ मुंबईपुरते मर्यादित न ठेवता हैदराबाद, बंगळुरू, गोवा, दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांशी थेट जोडण्याची मागणी सातत्याने होत आहे.